इंग्रजांच्या परकीय सत्तेशी प्राणपणाने लढणाऱ्या आदिवासी महादेव कोळी, भिल्ल, ठाकर या जमातीच्या बंडखोरांनी आणि त्यांच्या नायकांनी स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान दिले आहे. राघोजी भांगरा(भांगरे) हा या परंपरेतील एक भक्कम, ताकदवान, धाडसी, रुबाबदार बंडखोर नेता होता. कारकिर्द म्हणजे रोमांचकारी घटनांची मालिका होती.
सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील देवगाव गावात ८ नोव्हेंबर १८०५ रोजी रामजी व रमाबाई यांच्यापोटी राघोजीचा जन्म झाला. त्या काळातील जव्हारच्या मुकणे संस्थानच्या राजूर प्रांताचे रामजी भांगरे सुभेदार होते. त्या काळात गावात शिक्षणाची सोय नसतानाही राघोजीसाठी खास घरी शिकण्याची सोय करण्यात आली होती. लहानपणापासून राघोजीला व्यायामाची आवड होती. त्याचे शरीर सुदृढ होते. बालपणातच राघोजी धाडसी खेळ तो खेळत असे. अन्यायाची त्याला चीड होती. इतिहासाची पाने चाळताना लक्षात येते की काळाचे संदर्भ गतीने बदलत गेले. इंग्रजी सत्तेकडून जुलूम वाढले. त्याविरुद्ध राघोजी पेटून उठला. त्याने इंग्रजी सत्तेविरुद्ध दंड थोपटून बंड केले.
पेशवाई बुडाल्यानंतर (१८१८) इंग्रजांनी महादेव कोळ्यांचे सह्याद्रीतील किल्ले, घाटमाथे राखण्याचे अधिकार काढून घेतले. किल्ल्याच्या किल्लेदारांच्या जबाबदाऱ्या काढल्या. बुरुज नष्ट केले. वतनदाऱ्या काढल्या. पगार कमी केले. परंपरागत अधिकार काढून घेतल्याने स्वाभिमानी असलेल्या महादेव कोळ्यांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला. १८२८ मध्ये शेतसारा वाढविण्यात आला. सारा वसुलीमुळे गोरगरीब आदिवासींना रोख पैशाची गरज भासू लागली. ते सावकार, वाण्यांकडून भरमसाठ दराने कर्जे घेऊ लागले. कर्जाच्या मोबदल्यात सावकार जमिनी बळकावू लागले. लोक भयंकर चिडले सावकार आणि इंग्रजांविरुद्ध बंडाला त्यांनी सुरुवात केली. अन्याया विरुद्ध पेटून उठलेल्या महादेव कोळी समाजातील बंडखोर नेत्यांनी या बंडाचे नेतृत्त्व केले.
अकोले तालुक्यातील रामा किरवा याला पकडून नगर येथील तुरुंगात फाशी (१८३०) देण्यात आली. यातून महादेव कोळी बंडखोरांमध्ये दहशत पसरेल असे इंग्रजांना वाटत होते. रामाचा जोडीदार राघोजी भांगरे याने सरकारविरोधी बंडात सामील होऊ नये यासाठी त्याला मोठ्या नोकरीवर घेतले. परंतु नोकरीत पदोपदी होणारा अपमान आणि काटछाट यांमुळे राघोजी भयंकर चिडला. नोकरीला लाथ मारून त्याने बंडात उडी घेतली. उत्तर पुणे व नगर जिल्ह्यात राघोजी आणि बापू भांगरे यांच्या नेतृत्वाखाली मोठा उठाव सुरु झाला. १८३८ मध्ये रतनगड आणि सनगर किल्ल्याच्या परिसरात त्याने बंड उभारले. कॅप्टन मॅकिंटोशने हे बंड मोडण्यासाठी सर्व अवघड खिंडी, दऱ्या, घात, रस्ते, जंगले यांची बारीकसारीक माहिती मिळविली. बंडखोरांची गुपिते बाहेर काढली. नाकेबंदी केली. मात्र भूगोलाची नीट माहिती असल्याने गनिमी काव्याने चाली रचत बंडखोर लढत राहिले. ते नमले नाहीत. बंडाने व्यापक रूप धारण केले.
इंग्रजांनी कुमक वाढविली. गावे लुटली. मार्ग रोखून धरले. अनेक लोकांना कैद केले. दहशतीमुळे काही लोक उलटले. फंदफितुरीमुळे राघोजीचा उजवा हात समजाला जाणारा बापुजी मारला गेला. राघोजीला पकडण्यासाठी इंग्रज सरकारने त्या काळी पाच हजारांचे बक्षीस जाहीर केले. ठाणे ग्याझेटियर्सच्या जुन्या आवृत्तीत ऑक्टोबर १८४३ मध्ये राघोजी मोठी टोळी घेऊन घाटावरून खाली उतरला आणि त्याने अनेक दरोडे घातले असा उल्लेख आहे. राघोजीने मारवाड्यांवर छापे घातले. त्यांनी पोलिसांत तक्रार केली. सामान्य लोकांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याचे काम राघोजी करू लागल्याने त्याच्याविषयी कोणीही सरकारला माहिती देत नव्हते. ठावठीकाणा विचारायला आलेल्या पोलिसांना माहिती न दिल्याने चिडलेल्या पोलिसांनी त्यांच्या आईचे निर्दयपणे हाल केले. त्यामुळे चिडलेल्या राघोजीने कारवाया करत नगर व नाशिकमध्ये इंग्रजांना सळो को पळो करून सोडले. त्या काळात सावकारांना सत्तेचा आसरा होता. त्यांना ब्रिटिशांचे हस्तक समजले जाई. हाती लागलेल्या प्रत्येक सावकाराचे नाक कापले. राघोजीच्या भयाने सावकार गाव सोडून पळून गेले, असा उल्लेख अहमदनगर ग्याझेटियर्समध्ये सापडतो. साताऱ्याच्या पदच्युत छत्रपतींना पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी इंग्रजांविरुद्ध उठावाचे जे व्यापक प्रयत्न चालले होते. त्याच्याशी राघोजीचा संबंध असल्याचे सांगितले जाते. छत्रपतींनी राघोजीला एक पत्र लिहिले होते. बंडासाठी पैसा उभारणे, समाजावर पकड ठेवणे व छळ करणाऱ्या सावकारांना धडा शिकविणे या हेतूने राघोजी खंडणी वसूल करीत असे. नोव्हेंबर १८४४ ते मार्च १८४५ या काळात राघोजीचे बंड शिगेला पोचले होते. बंड उभारल्यानंतर राघोजीने आपण गोरगरीब जनतेचे कैवारी असून सावकार व जुलमी इंग्रज सरकारचे वैरी आहोत, अशी भूमिकाच जाहीर केली होती.
महिलांबद्दल राघोजीला अत्यंत आदर होता. टोळीतील कुणाचेही गैरवर्तन तो खपवून घेत नसे. शौर्य व प्रामाणिक नितीमत्ता याला त्याने अध्यात्मिकतेची जोड दिली. महादेवावर त्याची अपार श्रद्धा व भक्ती होती. भीमाशंकर, वज्रेश्वरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक, पंढरपूर येथे बंडाच्या काळात तो दर्शनाला गेला होता. त्याच्या गळ्यात वाघाची कातडी असलेल्या पिशवीत दोन चांदीचे ताईत असत. त्याच्या बंडाला ईश्वरी संरक्षण आणि आशीर्वाद असल्याची त्याची स्वतःची खात्री होती. धारेराव आपल्याला लढायला बळ देतो असेही त्याचे मानणे होते. देवजी हा त्याचा प्रमुख सल्लागार आणि अध्यात्मिक गुरु होता. मे १८४५मध्ये गोळी लागून तो ठार झाला. त्यानंतर राघोजी खचला असावा. नंतरच्या काळात साधूच्या वेशात तो तीर्थयात्रा करू लागला. विठ्ठलाच्या दर्शनाला त्याने दिंडीतून जायचे ठरविले. ईश्वरी शक्तीची तलवार, चांदीचे ताईत आणि लांब केस याची साथ त्याने सोडली. २ जानेवारी १८४८ या दिवशी इंग्रज अधिकारी लेफ्टनंट गेल याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी राघोजीला ओळखले. चंद्रभागेच्या काठी गेलच्या तुकडीने राघोजीला अटक केली. कसलाही विरोध न करता तो पोलिसांच्या स्वाधीन झाला.
साखळदंडात करकचून बांधून त्याला ठाण्यात आणले गेले. विशेष न्यायाधीशांसमोर राजद्रोहाच्या खटल्याची सुनावणी झाली. वकील न मिळाल्याने राघोजीची बाजू न मंडळी जाता एकतर्फी सुनावणी झाली. राघोजीला दोषी ठरविले गेले. त्याला फाशीची शिक्षा ठोठाविण्यात आली. राघोजी खरा वीर पुरुष होता. बंडाच्या तीन पिढ्यांचा क्रांतिकारी इतिहास त्याला लाभला होता. "फाशी देण्यापेक्षा मला तलवारीने किंवा बंदुकीने मारा. वीर पुरुषासारखे मरण द्या.," असे त्याने न्यायाधीशांना निक्षून सांगितले होते अशा नोंदी आहेत. स्वाभिमानी आणि लढवय्या राघोजीने व्यक्त केलेली अपेक्षा पूर्ण झाली नाही. सह्याद्रीच्या या वाघाला २ मे १८४८ रोजी ठाणे येथील मध्यवर्ती कारागृहात फासावर चढविले.
लिखित इतिहासाने घनघोर उपेक्षा केलेला अनसंग हिरो होता राघोजी. पुणे, ठाणे, नगर, नाशिक या जिल्ह्यातील सीमावर्ती भागातल्या सह्यकड्याच्या कपारीत राहणाऱ्या गोरगरीब आदिवासींना नाडणाऱ्या जुलमी, अत्याचारी सावकारांची नाकं छाटणाऱ्या राघोजीचा पराक्रम, त्यांचं योगदान पहिल्यांदा मराठी मुलखासमोर ठेवले ते जुन्या पिढीतील व्यासंगी आणि ख्यातकीर्त पत्रकार वरुणराज भिडे यांनी. त्यांनी कुमार सप्तर्षी संपादक असलेल्या 'सत्याग्रही विचारधारा' या मासिकात दीर्घ लेख लिहून फार मोठे काम करून ठेवले आहे. त्यांनतरच आदिवासी संशोधक, नेते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, लेखक यांचे लक्ष राघोजी नामक महान क्रांतिकारकाकडे गेले.
इतिहासकारांनी राघोजीचा शौर्याची, धाडसी कारवायांची नोंद घेतली नसली तरी कळीकाळाचे भान असलेल्या आदिवासी समाजातील समकालीन आयबायांनी ओव्या, पोवाडे आणि इतर लोकगीतांमध्ये राघोजीचा अत्यंत गौरवपूर्ण उल्लेख केलेला आहे. पांडुरंग धोंगडे यांनी या लोकगीतांचे संकलन करून फारच मोठे काम करून ठेवले आहे. लोकसाहित्यातले संदर्भ तसेच काही लेख वाचून लेखक शांताराम गजे यांनी 'बाडगीची माची' ही कादंबरी लिहिली आहे. भाऊसाहेब नेहेरे यांनी राघोजीवर चरित्रवजा पुस्तक लिहिले आहे. ‘सह्याद्रीतील महादेव कोळी‘ या पुस्तकात संशोधक डॉ. गोविंद गारे यांनी राघोजीविषयी एक टिपण लिहिले आहे. यातून आता कुठं आदिवासी समाजातील थोर स्वातंत्र्यसेनानी असलेल्या राघोजी भांगरे यांच्यासारख्या जननायकाचा पराक्रमी वारसा, प्रेरणादायी, क्रांतिकारी इतिहास नवीन पिढीला माहिती होऊ लागला आहे. अन्यथा २ मे १८४८ रोजी राघोजीला ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली तेव्हाच इतिहासातील एक क्रांतिकारी अध्याय संपून गेला असता.
राघोजी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा बंडखोर वारसदार! रामा किरवा, रामजी भांगरा, उमाजी नाईक, तंट्या भिल्ल... अशा अनेक आदिवासी क्रांतिकारकांनी दिलेल्या योगदानाची नोंद इतिहासाने घेतल्याचे दिसत नाही. वासुदेव बळवंत फडके यांचा आद्य क्रांतिकारक असा उल्लेख होतो. मात्र राघोजीने इंग्रजांविरुद्ध लढा उभारला तेव्हा वासुदेव बळवंत फडके अवघे तिनेक वर्षांचे होते! राघोजीच्या बंडानंतर सुमारे पंचवीस वर्षांनी वासुदेव बळवंत फडके यांचे बंड सुरु झाले. ही नोंद घेणे इथे विशेष उल्लेखनीय आहे. जगाचा इतिहास जेत्यांनी लिहिलेला असल्याने पराभूत झालेल्यांच्या पराक्रमाच्या गाथा शब्दबद्ध झालेल्या दिसत नाहीत. तसेच काहीसे अभिजन इतिहासकारांनी बहुजनांच्या इतिहासाबाबत, नायकांबाबत केलेले दिसते.
राघोजीच्या राजकीय बंडखोरीच्या अनेक नोंदी, पोलिस दप्तरांत, गॅझेटमध्ये आहेत. नाही असे नाही. पण त्याकडे दुर्लक्ष झाले असावे.
पाठ्यपुस्तकांमध्ये राघोजी भांगरे, उमाजी नाईक, तंट्या भिल्ल अशा महान नायकांचे योगदान वाचायला मिळाले नाही. खरे तर आदिवासी नायकांची चरित्रमाला प्रकाशित करायला हवी. आदिवासी समाजातील क्रांतिकारक किंवा पूर्वासुरींनी दिलेले लढे ग्रथित झालेले दिसत नाहीत. आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वाचनालयातील पुस्तकांतही कोणती पुस्तकं असतात? त्यात आदिवासी लोकजीवन आणि संस्कृती किती असते? त्यामुळे मुलं आपल्या सांस्कृतिक परंपरेबाबत अनभिज्ञ राहतात.
आदिवासींना डोंगरावर गुरे चारायला इंग्रजांनी बंदी केली आणि राघोजीने त्याविरुद्ध बंड पुकारले. जंगल आमचं आहे, आम्ही आदिवासी जंगलचे राजे आहोत, तुम्ही आम्हाला रोखणारे कोण? असा खडा सवाल उपस्थित करणारा राघोजी पहिलाच असावा! राघोजीचा तेजस्वी जीवनपट त्याग, समर्पण, पराक्रम हे सारे बघता झालेले काम अपूर्ण आहे असेच वाटत राहते. म्हणूनच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने राघोजीचा चरित्र ग्रंथ प्रकाशित करायला हवा. त्याचा आणि आदिवासी क्रांतिकारकांचा प्रेरणादायी लढा नव्या पिढीसमोर यायलाच हवा. त्यासाठी अजून संशोधन होण्याची आवश्यकता आहे. आदिवासी क्रांतिकारकांचं स्वातंत्र्य समरातील योगदान अनुल्लेखित राहता कामा नये.
- भाऊसाहेब चासकर, अकोले.
0 comments :
Post a Comment