महादेव कोळी या सह्याद्रीतील जमातीविषयी कॅप्टन मॅकिन्टॉश यांची काही चुकीची गृहितके....
कॅप्टन मॅकिन्टॉश हा ब्रिटिश अधिकारी होता आणि त्याची नेमणूक ही सह्याद्रीतील महादेव कोळी जमातीचे बंड मोडीत काढण्यासाठी नेमणूक केलेली होती.
सह्याद्रीत आल्यानंतर अनेक प्रयत्न करूनही त्याला खाडे आणि भांगरे यांचे बंड मोडीत काढता आले नाहीत.
फंद फितुरी, फोडा आणि राज्य करा या ब्रिटिशांच्या कुटनिती देखील महादेव कोळी बंड मोडीत काढण्यात अपयशी ठरल्या.
नानाविध प्रयत्न करूनही महादेव कोळी ब्रिटिश सत्तेला नमवता येत नाहीत, म्हणून त्यांच्यात नक्की कोणते रसायन भरलेले आहे याचा शोध घेण्यासाठी महादेव कोळ्यांच्या संस्कृतीचा अभ्यास करण्याचा थोडा फार प्रयत्न केला.
ब्रिटिशांना खरं तर महादेव कोळ्यांनी कधीही अचूक माहिती दिली नाही हे इतिहासात सर्वश्रुत आहे. अगदी जीव दिला लोकांनी, पण ब्रिटिशांना बंडकऱ्यांची माहिती दिली नाही. असे असताना सांस्कृतिक माहिती तरी अचूक कसे देतील हा देखील एक संशोधनाचा प्रश्न आहे.
महादेव कोळी बंडाचा उगम त्यांच्या सांस्कृतिक व भौगोलिक उत्पत्तीत असावा म्हणून कॅप्टन मॅकिन्टॉशने त्या दृष्टिकोनातून माहिती घेण्याचा प्रयत्न केला.
सह्याद्रीतील आदिवासी व त्यांची बोली, त्यांचा अबोलपणा बघता मॅकिन्टॉशला महादेव कोळ्यांनी विशेष माहिती दिली नाही. त्याने खूप प्रयत्न करून वरवर माहिती मिळवली आणि एक अंदाज लावत महादेव कोळी हे बालाघाट किंवा महादेव डोंगर रांगातून आल्याचे अत्यंत चुकीचे मत मांडले. अर्थात हा देखील महादेव कोळ्यांच्या युद्धनीतीचा एक भाग होता. त्यांनी कॅप्टन मॅकिन्टॉशला जाणीवपूर्वक खोटी माहिती पुरवली. याची पडताळणी करायची असेल तर आजही बालाघाट किंवा महादेव डोंगररांगात जाऊन बघितले तर तिथे महादेव कोळी जमातीचे कोणतेही अस्तित्व जाणवत नाही. तेथे असणाऱ्या कोल किंवा कुर जमातीचा सह्याद्रीतील महादेव कोळ्यांशी जमातीच्या दृष्टिकोनातून कोणताही संबंध नाही. याची पडताळणी स्वतः घुऱ्ये यांनी केलेली होती. त्याबाबत त्यांनी आपल्या पुस्तकात स्पष्टपणे लिहिलेले देखील आहे.
तसेच कॅप्टन मॅकिन्टॉश यांचा अहवाल पुढे वाचला असता, त्यात जी महादेव कोळ्यांच्या कुळांची माहिती दिलेली आहे. तीचा विचार करता कॅप्टन मॅकिन्टॉश याला महादेव कोळी हि जमात व कोळी ही जात यातील फरक समजलेला नसावा असेच दिसते. कारण त्यातील कुळांचा महादेव कोळी जमातीशी दूरवर काडीमात्र सबंध नसल्याचे दिसून येते.
कॅप्टन मॅकिन्टॉश याने दिलेल्या अहवालातील काही बाबी ह्या अत्यंत चुकीच्या असतानाही त्यांची पडताळणी न करता इंथोवेन, रसेल, जॉन्सन यांनी त्याचाच आधार घेऊन महादेव कोळी जमाती बाबत चुकीची मांडणी केलेली आहे. आदिवासींच्या परंपरा, संस्कृती, रूढी, चालीरीती या मौखिक असल्याने त्यांना लिखित साहित्य उपलब्ध नसल्याने बाहेरील लोकांनी याच लेखकांना प्रमाण मानून आदिवासीमधील महादेव कोळी जमातीबाबत अत्यंत चुकीच्या माहितीचा प्रसार केलेला आहे.
महादेव कोळी जमात समजून घ्यायची असेल तर सह्याद्रीतील फक्त भीमाशंकर ते त्र्यंबकेश्वर यातील महादेव कोळी वस्ती असलेल्या भागाचा विचार करणे अधिक संयुक्तिक असेल. बाकीच्या ठिकाणी प्रमाणपत्र महादेव कोळी असू शकेल, पण महादेव कोळी संस्कृती नसेल हे मात्र नक्की. म्हणूनच सरकारने महादेव कोळी जमातीचा उल्लेख करताना क्षेत्राचा उल्लेख प्रकर्षाने केलेला आहे. त्यात डोंगर कोळी हा पर्यायी शब्द वापरून महादेव कोळ्यांचे क्षेत्र भौगोलिक दृष्टीने निश्चित केलेले आहे.
महादेव कोळी जमातीचा सांस्कृतिक उगम व विकास याबाबत सह्याद्रीतील महादेव कोळ्यांनी अधिक अभ्यासपूर्ण मांडणी करणे अधिक संयुक्तिक राहील.
कॅप्टन मॅकिन्टॉश हा मानववंशशास्त्रज्ञ नव्हता व तसा त्याचा कोणताही अनुभव देखील नाही. त्याची नेमणूक ही मुळात महादेव कोळी जमातीवर दमण करणे या उद्देशाने झालेली होती. त्यामुळे त्याच्याकडून करण्यात आलेली मांडणी ही अचूक असेलच याची खात्री बाळगणे चुकीचे आहे. उमाजी नाईक यांचे बंड मोडीत काढण्यासाठी रामोशी जातीचा व महादेव कोळी लोकांचे बंड मोडीत काढण्यासाठी महादेव कोळी जमातीचा केलेला अभ्यास हाच तो काय त्याचा अनुभव... त्यामुळे या जमातीकडे बघण्याचा दृष्टीकोन किती प्रामाणिक असेल हे आपण तपासले पाहिजे.
www.aboriginalvoice.blogspot.com
Journey with the Hidden Facts
0 comments :
Post a Comment