अस्तित्वासाठी आदिवासींची लढाई....
सन 1775-76 चा कालखंड होता. भल्या सकाळी एक घोडेस्वार शिवनेर प्रांतातून निघून कुंजरगडाच्या पायथ्याला पोहचला होतात. त्याच्या हातातील लखोटा पाहून काही तरी तातडीचे काम असावे असे रखवालदारांना वाटले होते. परंतु पटल्याशिवाय त्याला गडावर जायची परवानगी मिळत नव्हती. शेवटी सोनजी सावंत यांचा निरोप आला आणि त्या घोडेस्वाराला गडावर जायला परवानगी मिळाली. त्याने लगबगीने आपला घोडा तिथेच एका झाडाला बांधून धावपळ करीत गड चढला. गडाची उंची फार काही नसली, तरी वर जाई पर्यंत त्याला धाप लागली होती. थोडासा श्वास घेत त्याने आपल्या हातातील लखोटा किल्लेदार सोनजी सावंत यांच्या हातात देत मुजरा केला. दुसरा लखोटा तितक्याच तातडीने हरिश्चंद्र गडावर द्यायचा असल्याने जाण्याची परवानगी मागितली.
घोडेस्वार पुढील प्रवासाला लागल्यानंतर सोनजी यांनी आपल्या हातातील लखोटा कारकुनाच्या हातात देत त्यातील मजकूर वाचायला सांगितला.
कारकूनानाने क्षणाचाही विलंब न लावता त्यातील मजकूर वाचून दाखवला.
किल्ल्याच्या परिसरातील महादेव कोळ्यांचे बंड मोडीत काढले नाही, तर आपलं पद जाईल या भीतीने सोनजी सावंत यांनी शिवनेर तालुक्यात मदतीसाठी अगोदरच निरोप पाठवला होता. त्यालाच उत्तर म्हणून हा लखोटा आल्याचे सर्वांना समजले होते.
संताजी शिळकंदे या महादेव कोळी बंडकऱ्याने लोकांच्या मनावर राज्य करत येथील सावकार, जमीनदार यांना जेरीस आणले होते. कुंजरगड परिसरातील गावांच्या रक्षणाची जबाबदारी किल्लेदार म्हणून सोनजी सावंत यांची असली तरी ते संताजी शिळकंदे यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरले होते. त्यांच्या मदतीसाठी जुन्नर प्रांतातून गोपाळ बल्लाळ यांची नेमणूक केल्याने सोनजी सावंत यांना बळ आले होते.
किल्ले कुंजरगडावरील लखोटा दिल्यानंतर वाऱ्याच्या वेगाने निघालेला घोडेस्वार हरिश्चंद्रगडावर किल्लेदार संताजी सावंत यांना मुजरा करू लागला होता. त्यांनाही संताजी शिळकंदे व इतर महादेव कोळी बंडकऱ्यांच्या बंदोबस्तासाठी जुन्नर प्रांतातून गोपाळ बल्लाळ यांची नेमणूक केल्याचा लखोटा मिळाला होता.
संताजी शिळकंदे याच मातीत जन्माला आलेले व या डोंगरदऱ्यांच्या अंगाखांद्यावर खेळत मोठे झालेले असल्याने बाहेरून कितीही सैनिक नेमले तरी हातात येत नव्हते. स्थानिक लोकांचा या बंडाला छुपा पाठिंबा असल्याने त्यांना कटक करण्यात यश मिळत नव्हते.
महादेव कोळ्यांचे बंड सलग तीन चार वर्षे सुरू असूनही ते मोडीत काढण्यात यश येत नसल्याने सोनजी सावंत व संताजी सावंत यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यांच्या किल्लेदा-या धोक्यात आल्या होत्या. त्यांचा स्थानिक जनतेवर असलेला वचक हळूहळू कमी होऊ लागल्याने येथील प्रशासकीय कामात अडचणी येत होत्या. त्यामुळे सदर बंड काहीही करून मोडीत काढलेच पाहिजे असा प्रचंड दबाव निर्माण झालेला होता. वेळोवेळी राजूर व जुन्नर येथील मदत मागितली जात होती. परंतु त्याचाही काही उपयोग होत नव्हता. शेवटी सन 1781-82 मध्ये संताजी शिळकंदे या महादेव कोळी बंडक-याची पत्नी व मुलांना जबरदस्तीने अटक करण्यात आली व त्यांना बंदी बनवून शिवनेर येथील कारागृहात डांबून ठेवण्यात आले.
सोनजी सावंत व संताजी सावंत यांच्या अस्तित्वाच्या लढाईत अनेक महादेव कोळी बांधवांना बंदी बनवण्यात आले, काहींना धमकवण्यात आले, फितुरांना प्रलोभने दाखवण्यात आली. परंतु तरीही संताजी शिळकंदे हा महादेव कोळी बंडकरी त्यांच्या हातात आला नाही.
महादेव कोळी बंडकरी यांचे बंड हे सत्तेसाठी नाही, तर आपल्या वरील अन्यायाच्या विरोधात, अस्तित्वासाठी, जल, जंगल व जमिन या आपल्या अधिकारांसाठी असल्याने परिसरातील सर्वच जाती धर्मातील लोकांचा त्यांना पाठिंबा असायचा. सन 1775-76 सालापासून सुरू असलेली लढाई आजही आदिवासींना विविध कारणांसाठी लढावी लागत आहे.
आज राजूर या आपल्या पेसा ग्रामपंचायतीत असाच अस्तित्वाचा, हक्कांचा लढा देण्याची आपणास गरज आहे. प्रश्न इतिहासाचा असेल, तर आदिवासी त्यातही कमी नाहीत. मुद्दा बलिदानाचा असेल, तर आदिवासीं इतकं बलिदान या मातीसाठी कोणी दिलेले नाही. प्रश्न संविधानिक हक्कांचा आहे, म्हणून या लढ्यात सर्वांनी पुढे आले पाहिजे व या येऊ घातलेल्या भांडवलशाही व्यवस्थेला मोडीत काढले पाहिजे.
(क्रमशः)
ऐतिहासिक संदर्भ: जनार्दन अप्पाची डायरी
0 comments :
Post a Comment