आदिवासी चळवळी व त्यातील कार्यकर्त्यांनी आदिवासी इतिहासावर काम करण्याची गरज....
1857 च्या बंडापूर्वी 75 वर्षे, आदिवासींनी ब्रिटिशांच्या विरोधात उठाव केला होता. त्या वेळी आदिवासी धनुष्यबाण, भाले ही त्यांची पारंपरिक शस्त्रे वापरून लढले होते. एकोणिसाव्या शतकात ज्या राजकीय चळवळीचा इतिहास आपण वाचतो, त्यांची सुरुवात या आदिवासी बंडक-यांनी त्यापूर्वीच केली होती.
भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना आपल्याला दुर्गम भागात, जंगलात आदिवासींनी सुरू केलेल्या स्वातंत्र्यसंग्रामाची नोंद घेणे महत्त्वाचे ठरते. इतिहासाच्या पुस्तकात वर्णन केलेल्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या मुख्य प्रवाहाला समांतर असे हे लढे आदिवासी लढत होते, याचीही दखल घ्यायला हवी.
भारतातील थोर आदिवासी क्रांतिकारकांनी ब्रिटिश आक्रमणाला आव्हान देणाचा पुरेपूर प्रयत्न केला. या नायकांच्या शौर्याला प्रकाशात आणण्याचा प्रयत्न सर्वांनी करणे आवश्यक आहे. त्यांनी देशासाठी दिलेले योगदान आजपर्यंत दुर्लक्षित राहिले. ते सर्वासमोर आणावे यासाठी आजच्या सामाजिक चळवळींनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. आदिवासी बंडक-यांच्या उठावाची सुरुवात अभ्यासण्यासाठी तिलका मांझी यांच्यापासून सुरुवात करणे आवश्यक आहे. त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात लढताना गनिमी काव्याचा वापर केला. आपल्या संविधानसभेत अतिशय अभ्यासपूर्ण भाषण देणारे जयपाल मुंडा यांच्या कार्याचाही आजच्या तरुण आदिवासी कार्यकर्त्यांनी सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यांनी आपल्या भाषणातून आदिवासी चळवळीचा मागोवा घेतला होता. हे शूर योद्धे देशाच्या सर्व भागांत होते. ईशान्य भारतापासून ते दक्षिण भारतातील विविध जमातीतील आदिवासींनी दिलेला लढा हे स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासातील महत्त्वाचे एक पान आहे. ते उजेडात आणण्यासाठी आदिवासींच्या साहित्यिक चळवळीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
मार्शल गांझ यांचे वक्तव्य बघितले तर आपल्या कार्याला एक विशिष्ट दिशा मिळण्यास मदत होते. त्यांच्या मते, "कुठल्याही चळवळीत एक गोष्ट दडलेली असते. चळवळ म्हणजे फक्त अर्थकारण आणि राजकारणाची पुनर्रचना नसते, तर तिला इतरही अनेक संदर्भ असतात आणि ते अर्थपूर्ण असतात. 'चळवळ म्हणजे काय चांगलं आहे', त्याचं आकलन होणं असतं."
मार्शल गांझ यांचे वरील वक्तव्य बघितले तर आदिवासी चळवळींनी देश उभारणीच्या सुरुवातीच्या काळात भूतकाळात काय घडलं याची मांडणी करत असताना इतिहासातील अनेक अपरिचित तपशील पुन्हा एकदा तपासणे व त्याची नव्याने मांडणी करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. असं असलं तरी महाराष्ट्रातील आदिवासी चळवळींनी मात्र या कार्याकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष्य केल्याचे दिसून येते. आज पर्यंत इतिहासाच्या पुस्तकात जे दाखवलं आणि सांगितलं गेलं, त्यापेक्षा आदिवासींचा इतिहास वेगळा आहे, हे समाजाच्या लक्षात आणून देणे ही आदिवासी चळवळींची प्रमुख भूमिका असायला हवी होती. परंतु चळवळींना या कार्याकडे वळण्यासाठी 75 वर्षे उलटून गेलेली आहेत. अजूनही किती वर्ष जातील हे आजही निश्चित सांगता येणे अवघड आहे.
लेखक तुहिन सिन्हा यांच्या मतानुसार खिलाफत चळवळीसारख्या बनावट चळवळीत अडकून न पडता बिरसा मुंडा सारख्या आदिवासी योध्याची माहिती समजून घेणे आवश्यक आहे. वसाहतवादी पूर्वगृहातून बाहेर पडून आपल्या देशातील दुर्लक्षित आदिवासी इतिहासाला ओळखायला, त्यातील अपेक्षित नायकांचा सन्मान करायला आपण पुढाकार घेणे आवश्यक आहे. डिजिटल युगामुळे आदिवासींच्या चळवळींचा दस्तावेज निर्माण करणे आता पूर्वीसारखे अवघड राहिले नाही. त्यामुळे भारतीय स्वातंत्र्याची प्रस्थापित चळवळ सुरू होण्यापूर्वीच्या आदिवासी जीवनातील घटना, चळवळींनी स्वातंत्र्याकडे आगेकूच केली होती याची मांडणी सक्षमपणे होणे आवश्यक आहे.
आदिवासी क्रांतिकारकांच्या यादीतले सर्वात सुरुवातीचे क्रांतिकारक म्हणजे, बाबा तिलका मांझी होय. त्यांनी 1784 साली ब्रिटिशांच्या विरोधात शस्त्र उगारले. वसाहतवादी लोकांच्या विरोधात झालेली ती पहिली सशस्त्र क्रांती होती.अत्याचारी, पिळवणूक करून जमीन लुटणाऱ्या ब्रिटिशांच्या विरुद्ध उठाव करायला त्यांनी संथाळांना प्रवृत्त केले. मात्र, त्यांनी दाखवलेल्या शौऱ्याची किंमत त्यांना चुकवावी लागली. त्यांना निष्ठुरपणे मारण्यात आले.
केरळ राज्यातील वायनाड येथील थलक्कल चंदू या आदिवासी योध्याचा इतिहास देखील अजून जनतेसमोर आलेला नाही. पझासी राजाच्या कुरीचीयान सैनिकांचा, हा प्रमुख निष्णात तिरंदाज होता. एकोनीसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात तो वायनाडच्या जंगलात ब्रिटिशांशी लढला.
कुरीचीयान लोकांच्या उठावानंतर ईशान्येकडील खासी हिल्स इथे ब्रिटिशांच्या विरोधात बंडाची ठिणगी पेटली. त्याच सुमारास झारखंड येथे कोल आदिवासींनी उठाव केला. या दोन्ही घटना 1830 च्या दशकाच्या सुरुवातीला घडल्या. सध्याच्या मेघालय आणि झारखंडच्या रांची या भागात पुढचे बंड पेटले. ऊ तिरोत सिंग आणि बुधू भगत या दोघांनी या बंडाचे नेतृत्व केले.
या क्रांतिकारकांच्या पावलावर पाऊल टाकत पुढे अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी देशभर निरनिराळ्या ठिकाणी क्रांतीची मशाल पेटवली. याचा फायदा 1857 च्या उठावात झाला. यात सिद्धू - कानहो मुर्मू या दोघा भावांचा प्रमुख सहभाग होता. 1855 साली झालेल्या संथाळांच्या संग्रामाचे ते प्रमुख शिलेदार होते. त्याची सुरुवात, सध्याच्या झारखंडमधील साहिबगंज जिल्ह्यात झाली. बाबुराव शेडमाके या गोंड आदिवासी क्रांतिकारकाने त्याच सुमारास महाराष्ट्रात उठाव केला.
मध्यप्रदेशात तंट्या भिल्ल यांनी संपूर्ण दशकभर ब्रिटिश राजवटीशी टक्कर दिली. त्यांच्या शौर्याची गाथा तितकीच महत्त्वपूर्ण आहे.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकात देशभर अशाच प्रकारचे उठाव झाले. मणिपूरची राणी गायडीनल्यू, रांचीमधील जतरा उरांव, सिक्कीम येथील हेलेन लेपचा, कुर्सेओंगमधील पुतलीमाया देवी तमांग, आंध्र प्रदेशचा अल्लुरी सिताराम राजू, ओरीसामधील लक्ष्मण नायक असे हजारो आदिवासी बंडकरी या सुमारास घडलेल्या क्रांतीयुध्दातील प्रमुख क्रांतिकारक होते. 1918 साली गुजरातमधल्या तापी जिल्ह्यात जन्मलेल्या दशरीबेन चौधरी यांची ऐतिहासिक गाथाही प्रेरणादायी आहे. महात्मा गांधींची भेट झाल्यावर त्या अगदी लहान वयात सत्याग्रहात सहभागी झाल्या. जयपाल सिंग मुंडा यांचीही गोष्ट अशीच रोचक आहे. ते हॉकीचे पूर्व कप्तान होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली जी संविधान सभा होती, त्यात त्यांनी आदिवासींचे प्रतिनिधित्व केले. आजच्या आदिवासी तरुणांनी संविधान सभेतील जयपाल सिंग मुंडा यांची भाषणे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. एक आदिवासी म्हणून संविधानात त्यांना काय अपेक्षित होते आणि आज ते आदिवासींना मिळत आहे का याचा चिकित्सक अभ्यास झाल्यास आदिवासी चळवळींना योग्य दिशा मिळण्यास नक्की मदत होईल.
सध्याच्या गुजरात आणि राजस्थान यांच्या सीमेवर गुरू गोवंद गिरी यांनी भरीव कामगिरी केली. ते सामाजिक आणि धार्मिक सुधारक होते. ते भिल्ल जमातीच्या हक्कांसाठी लढले. आदिवासींमध्ये त्यांनी जे योगदान दिले, त्याचा आजही सन्मानपूर्वक उल्लेख होतो. भगत चळवळ सुरू करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते.
तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात असिफाबाद हे गाव आहे. तिथल्या कोमाराम भीम याने गोंड आदिवासींचे नेतृत्व करून उठाव केला. बिरसा मुंडा यांच्या उठावाची नोंद तर जगाने घेतलेली आहे. सह्याद्रीतील रामजी भांगरे, राघोजी भांगरे, रामा किरवा, हैबती खाडे, ढवळा भांगरे, रामा डगळे, होनाजी केंगले, सत्तू मराडे, खेमा नाईक, जावजी बांबळे, ओतुरचे शेळकंदे पाटील, बापू भांगरे, बाळू पिचड, काशिराम किरवे, सखाराम सातपुते यांच्याही ऐतिहासिक बलिदानाची माहिती चिकित्सकपणे समजून घेणे ही काळाची गरज आहे. याचबरोबर 14 व्या शतकात जव्हार येथे राज्य निर्माण करणारे जायबा मुकणे यांचाही इतिहास आपणास माहीत असणे आवश्यक आहे. सह्याद्रीत असलेली एक प्रमुख जमात म्हणून ठाकर समाज आपली वेगळी ओळख जपून आहे. या जमातीने 'राघोजी भांगरे यांची कोणतीही माहिती इंग्रज सरकारला देणार नाही' अशी सामुदायिक शपथ घेतली होती. हि देखील एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक बाब आहे. याचीही पार्श्वभूमी व महत्त्व समजुन घेणे तितकेच आवश्यक आहे.
खानदेशातील भिल्ल नायकांचे योगदान देखील अतिशय गौरवशाली आहे. सातमाळा प्रदेशातील भिल्लांचा प्रमुख चिल नाईक, जोंधळ्या नाईक, जाकि-या नाईक, सुभान्या नाईक, खाज्या नाईक, भागूजी नाईक, काजीसिंग नाईक अशा अनेक क्रांतिवीरांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान जनमाणसात पोहचले त्यासाठी प्रयत्न होणे ही काळाची गरज आहे.
आदिवासी स्त्रियांचे योगदान देखील या स्वातंत्र्य लढ्यात अतिशय प्रेरक आहे. त्याबाबतची सखोल माहिती समाजासमोर येणे ही काळाची गरज आहे. विविध ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आदिवासी महिलांच्या योगदानाबद्दल लिहून ठेवलेले आहे. त्यावर संशोधन करण्यासाठी आदिवासींच्या बुद्धिजीवी वर्गाने प्रयत्न केले तर अधिक चांगले होईल.
वारली उठाव, भिल्ल पोलिस कॉर्प, भिल्ल एजंट, छोटा नागपूर प्रदेशातील आदिवासी विद्रोह, तमार बंड, संथाळ हुल, देवी गुजरात चळवळ, मिदनापुर आदिवासी चळवळ, मालदामधील जितू संथाल चळवळ अशा काही मुख्य वसाहतवाद विरोधी आदिवासी चळवळी व उठाव समजून घेणे आवश्यक आहे.
असो 'जो समाज आपला इतिहास विसरतो, तो समाज आपलं भविष्य सुरक्षित करू शकत नाही' या उक्तीप्रमाणे आदिवासींनी आता आपल्या इतिहासावर काम करणे अत्यंत आवश्यक आहे. जितके अधिक काम इतिहासावर होईल, तितका अधिक समाज गतिशील होईल यात शंका नाही. आदिवासींकडे पाहण्याचा जगाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी आदिवासींच्या सामाजिक, सांस्कृतिक व ऐतिहासिक योगदानाबद्दल जास्तीत जास्त विचार मंथन घडवून आणणे आवश्यक आहे.
RaaJoo Thokal
www.aboriginalvoice.blogspot.com
संदर्भ :
1) वासाहतीक महाराष्ट्रातील आदिवासींचे उठाव, डॉ.विलास गवारी
2) भारतातील थोर आदिवासी क्रांतिकारक, तुहीन ए. सिन्हा
0 comments :
Post a Comment