आदिवासी इतिहास का समजून घेणे आवश्यक आहे?
इतिहास म्हणजे मानवजातीच्या जीवनप्रवाहाचा अभ्यास होय. इतिहासाचे प्राचीन, मध्ययुगीन व आधुनिक असे कालखंड आहेत. इतिहासाच्या कोणत्याही कालखंडाचा अभ्यास म्हणजे त्या कालखंडाचा राजकीय, आर्थिक, प्रशासकीय, सांस्कृतिक, धार्मिक बाजूंचा अभ्यास असतो. प्रसिद्ध इतिहासकार ई एच कार यांच्या मते, "भूतकाळ व वर्तमानकाळ यातील न संपणारा संवाद म्हणजे इतिहास होय." आदिवासींचे भविष्य सुरक्षित करायचे असेल तर हा भूतकाळ व वर्तमानकाळातील संवाद समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
आदिवासींनी आपला इतिहास समजून घेणे का गरजेचे आहे? या प्रश्नाची वेगवेगळी उत्तरे, शक्यता असू शकतात. वेगवेगळ्या तात्त्विक बाजू समजून घेताना त्यातून वेगवेगळ्या कसोट्या मांडल्या जाऊ शकतात. परंतु साहित्याचा एक वाचक म्हणून याकडे बघितले तर त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते, त्यानुसार इतिहासाचे अचूक ज्ञान हे ऐक्य आणि संरक्षणाचे स्त्रोत आहे म्हणून आदिवासींनी इतिहास समजून घेणे आवश्यक आहे. आज आदिवासी समाजात विविध आव्हाने, समस्या दिसून येतात. भारतात 700 पेक्षा अधिक आदिवासी जमाती आहेत. महाराष्ट्रात 45 जमाती आहेत. या प्रत्येक आदिवासी जमातीचे इतिहासात सांस्कृतिक, ऐतिहासिक, राजकीय योगदान दिसून येते. प्रत्येक आदिवासी जमातीची स्वतःची बोलीभाषा आहे. आज या जमाती अस्तित्वासाठी झगडत आहेत. या जमातींच्या अनेक बोलीभाषा देखील संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. आदिवासींच्या जल, जंगल आणि जमिनीचे एक वेगळे अर्थकारण सरकार दरबारी मांडले जात असल्याने त्यातून आदिवासींचे विस्थापन करणारे प्रकल्प आदिवासींवर लादले जात आहेत. यातून वाचायचे असेल तर आदिवासींच्या इतिहासाची पुनरावृत्ती हा एकमेव पर्याय आदिवासींसमोर आहे. त्यामुळे आदिवासींचा सांस्कृतिक, राजकिय, धार्मिक, ऐतिहासिक बलिदानाचा इतिहास चिकित्सकपणे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. आज आदिवासी भागात कुपोषण, बालमृत्यू, व्यसनाधीनता, अनारोग्य, बेरोजगारी, शिक्षण, दळणवळण, शासकीय योजना, राजकीय नेतृत्व अशा विविध पातळीवरील समस्या नित्याच्या दिसून येत आहेत. यावर सकारात्मक काम उभे करण्यासाठी इतिहासाची जाण लोकांना असणे अत्यंत आवश्यक आहे.
इतिहास हा समाज समजून घेण्याचा एक दृष्टिकोन आहे. त्यामुळे आदिवासी समजुन घेण्यासाठी आदिवासी इतिहासाचा अभ्यास इतरांनी समजून घेणे आवश्यक आहे. खासकरून आदिवासींसाठी विविध योजना राबविणाऱ्या यंत्रणेला हा इतिहास माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. आदिवासी समाज का समजून घ्यायचा असा देखील प्रश्न यातून पुढे येऊ शकतो. आधुनिक मानवी संस्कृतीच्या अभ्यासकांना सामाजिक संस्थांच्या उगमाबद्दल आणि मानवी व्यवहारांच्या मुलतत्त्वांबद्दल मांडणी करताना आदिवासी संस्कृतीचे व इतिहासाचेआकलन करून घेणे सर्वांसाठी आवश्यक आहे. कारण केवळ भारतापुरते पाहायचे म्हटले तरी भारतीय संस्कृतीचा इतिहास पाहता येथील आदिवासी समाज हा मुख्य प्रवाहापासून वेगळा दिसत असला तरी, त्यांनी या ना त्या प्रकारे भारतातील धर्म, कला, संस्कृती, परंपरा, प्रथा, इतिहास यांवर आपला ठसा उमटवलेला आहे. आदिवासी समाजातील व ऐतिहासिक आविष्कार समजावून घेतल्यास आपल्याला कालौघात लोप पावलेल्या किंवा विस्मृतीत गेलेल्या भारतीय सांस्कृतिक व ऐतिहासिक परंपरांच्या गूढ आणि प्रतीकात्मक अंगांचा शोध घेण्याची दिशा मिळू शकेल.
आज केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील सर्वच आदिवासी समाज हा मानवी संस्कृतीच्या मुख्य प्रवाहापासून विलग झालेल्या बेटांप्रमाणे आहेत. त्यांच्या सांस्कृतिक व ऐतिहासिक अंगांचा अभ्यास आपणास आज धूसर झालेल्या एकात्म मानवी संस्कृतीच्या मुळांचा शोध घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकेल. म्हणून भारतीय संस्कृती, कलाविश्र्व, सौंदर्यकल्पना, मानवी मूल्ये, इतिहास समजून घेण्यासाठी आदिवासी संस्कृती, कलविश्र्व व इतिहास समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे.
क्रमशः
राजू ठोकळ
www.aboriginalvoice.blogspot.com
0 comments :
Post a Comment