महाराणी सगुणाबाई मुकणे यांस दिनांक 13 डिसेंबर 1822 रोजी राज्यकारभार करण्याची अनुमती दिली. महाराज पतंगशहा हे अल्पवयीन असल्याने राजाच्या वतीने जव्हार संस्थानच्या सरकारचे कामकाज महाराणी सगुणाबाई मुकणे चालवतील असा निर्वाळा इंग्रज सरकारने दिला होता. परंतु जव्हार संस्थान व त्याच्या अंतर्गत असलेला परगणा गंजाडसह कोणत्याही व्यक्तीने कोणतीही हिंसक कारवाई केली तर, अशा कृत्यांना आळा घालण्यासाठी, आवश्यक असल्यास, ब्रिटिश सरकारची मदत घेता येईल असा निर्णय Cuteherry च्या दरबारात घेण्यात आला.
सदर निर्णय बघता जव्हार संस्थानच्या महिला देखील राज्यकारभारात मागे नव्हत्या याची जाणीव इंग्रज सरकारला होती हे दिसून येते. जव्हारच्या राजघराण्यातील महिलांनी अडचणीच्या काळात प्रचंड संघर्ष करून जव्हार संस्थानचे अस्तित्व अबाधित राखण्याचे काम केलेले आहे.
जव्हार, तलासरी, पालघर, डहाणू, खानवेल, खोडाळा, मोखाडा या भागातील महिला लढाई बाण्याच्या होत्या आणि त्यांनी आपल्या अस्तित्वासाठी अनेकदा तिरकमान हातात घेतलेले आपणास पाहायला मिळते. महिलांच्या सक्षम लढ्याची साक्ष देणारी एक वीरगळ खानवेल येथे आपणास आढळून येते. सदर वीरगळ आदिवासी संस्कृतीतील महिलांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करण्याचे काम करत आहे. आदिवासी संस्कृती ही मातृसत्ताक आहे. त्यामुळे संघर्षाच्या प्रसंगात ती कधीही मागे राहिली नाही हे या विरगळीच्या निरिक्षणातून आपण दिसून येते.
वरील व अशा अनेक ऐतिहासिक घटनांचा विचार करता आजच्या आदिवासी तरुणींनी परिस्थितीवर मात करत आपले इच्छित ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
0 comments :
Post a Comment