धनगर आरक्षण : काही तथ्ये...
"Dhangars rank themeselves with Marathas, and do not eat from the Ghisadis, Buruds, Parits and Jingars, whom they consider below them."
वरील उद्गार R.E.Enthoven यांनी आपले पुस्तक Tribes and Castes of Bombay, Vol - 1, page no. 311 ( Published in 1922 )वर नोंदविलेले आहेत.
जर धनगर हे स्वतःला मराठा समाजाच्या समान मानत होते व इतर काही जातींना आपल्यापेक्षा कमी लेखून अस्पृश्यता पाळत होते, तर त्यांना आदिवासींच्या पंगतीत बसण्याचा नैतिक व सामाजिक अधिकार नाही.
राजकीय कुरघोड्या करून सुमारे 1 कोटी 50 लाख लोकसंख्या असणारा धनगर समाज आज अजगररुपी सरकारची मदत घेऊन आदिवासींच्या 1 कोटी लोकसंख्येला गिळंकृत करू पाहत आहे. दुर्दैवाने संविधानिक चौकट समजून न घेता काही उजळ माथ्याचे राजकीय नेतृत्व त्यांना आश्वासन देऊन आपले मताचे ध्रुवीकरण करू पाहत आहेत. हे अतिशय असंविधानिक कृत्य घडत असताना आदिवासी समाज मोर्चे, आंदोलने करण्याचा प्रयत्न करत आहेत.
आदिवासी कधीही या समाजातील चातूर्वण्य व्यवस्थेचा भाग नव्हते. धनगर मात्र या व्यवस्थेत क्षत्रिय म्हणून अनेक वर्षे मिरवत होते. त्यांच्यात आर्थिक मागासलेपण असेलही, पण त्याची कारणे शोधून त्यावर योग्य त्या उपाययोजना आखणे हे सरकारचे काम आहे. सरकारला त्यासाठी काम करायला लावणे हे धनगरांच्या नेतृत्वाचे काम आहे. पण असे न होता, त्यांच्या गरिबीचे मूळ म्हणजे त्यांना आदिवासी आरक्षण नसणे असा अत्यंत चुकीचा विचार त्यांनी समाजात पेरला आहे आणि दुर्दैवाने त्यांच्या समाजाला ही अफवा आता सत्य वाटू लागली आहे. वास्तविक आदिवासी आरक्षणाने जर गरिबी हटवली जाऊ शकली असती, तर आज महाराष्ट्रातील 45 आदिवासी जमाती श्रीमंत झाल्या असत्या. पण तसे काही झालेले नाही. आदिवासींच्या जगण्यात गरिबीसोबत कुपोषण, अनारोग्य, बेरोजगारी, विस्थापन, शोषण, पिळवणूक, वेठबिगारी, छळ, अस्पृश्य वागणूक, हेटाळणी, गुलामी आलेली आपणास पहावयास मिळते. आदिवासींचे आरक्षण आदिवासींना न्याय मिळवून देण्यात अपयशी ठरले असल्याचे दिसून आलेले आहे. असे असताना धनगर आदिवासींत आले तर मूळ आदिवासींची अवस्था काय होईल याची कल्पना करता येऊ शकत नाही.
धनगर आरक्षणाला आदिवासींचा विरोध हा फक्त राजकीय किंवा सामाजिक पातळीवरच मर्यादित नाही. धनगर आदिवासींत आले, तर आदिवासींची जी मूळ सांस्कृतिक ओळख आहे, ती विस्कळीत होऊन त्याच्या व्याख्या बदलण्याची खरी भीती व धोका आदिवासींना आहे. आदिवासींना आरक्षणापेक्षा आपली आदिवासीयत टिकवून ठेवण्यासाठी धनगर समाजाला आपल्या पासून दोन हात लांब ठेवायचे आहे आणि ही भूमिका मुळात कोणी समजून घ्यायला तयार नाही.
ज्या इंथोवेनचा आधार घेऊन धनगर म्हणत आहेत की आम्ही आदिवासी आहोत, त्याच इंथोवेनने त्यांचे मुळ स्वरूप स्पष्ट केलेले आहे. परंतु दुर्दैवाने त्या बाबी समोर न मांडता, अपुरी माहिती प्रसारित करून समाजात संभ्रम निर्माण केला जात आहे.
इंथोवेनच्या पुस्तकात आलेल्या माहितीतून धनगर हे मराठा व कुणबी या जातीच्या समकक्ष जात म्हणून सविस्तर मांडणी केलेली आहे. अगदी लग्न पद्धती, व्यवसाय, सामाजिक मांडणी, भाषा असे विविध आधारभूत मुद्दे मांडून हे सिद्ध देखील केलेले आहे.
एवढेच नव्हे तर "In the Deccan and Konkan, however, Dhangar lost it's original tribal signification." ( Tribes and Castes of Bombay, Vol 1, Page 312) असा शब्दप्रयोग करून धनगर हे आदिवासी नाहीत असे शिक्कामोर्तब देखील केले आहे.
संसदेत हे सर्व सादर केल्यावर धनगर हे कधीच आदिवासी आहेत हे ते सिद्ध करू शकत नाहीत, हे लक्षात आल्यावर कोर्टातील दावा हा धनगड हेच धनगर आहेत या स्पेलिंगच्या चुकिवर केंद्रित करून समाजाच्या डोळ्यात धूळ फेकत आहेत.
असो या लढाईत शेवटी नुकसान दोन्ही बाजूचे होत आहे. राजकीय लोकांचे राजकारण बहरात येत आहे, तर गरीब भरडला जात आहे. हि राजकीय झुंज तर हजारो वर्षापासून ऐनकेन प्रकारे समाजात सुरू आहे. यापुढेही वेगवेगळ्या स्वरूपात सुरू राहील हे मात्र नक्की.
अजून यात सविस्तर व सबळ माहिती हवी असेल तर J H Hutton यांचे Caste in India हे पुस्तक देखील वाचले तर अधिक चांगले.
आपला बळी दिला जात आहे याची जाणीव लोकांना नसणे हे सर्वात मोठे दुर्दैव आहे.
- T Raa Joo
0 comments :
Post a Comment